मँचेस्टर - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या जाणार्या इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने अप्रतिम फलंदाजी केली. संकटात सापडलेल्या इंग्लंडसाठी त्याने पहिल्या डावात 176 धावा ठोकल्या. पण, या खेळीमध्ये त्याची एक गोष्ट सर्वांच्या लक्षात राहिली. ती म्हणजे शतक केल्यानंतर त्याने बोट वाकवून केलेले सेलिब्रेशन.
पण, या सेलिब्रेशनमागे काय अर्थ होता, हा प्रश्न अनेकांच्या मनात राहिला. रोस्टन चेसच्या चेंडूवर शतक केल्यानंतर स्टोक्सने आपले हेल्मेट जमिनीवर ठेवले आणि डाव्या हाताचा ग्लोव्ह बाहेर काढला. यानंतर, त्याने तो हात उंचावून मधले बोट वाकवले. त्याने असे करून आपल्या वडिलांना मानवंदना दिली.
बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स हे रग्बी खेळाडू होते. त्यांचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला. प्रशिक्षणानंतर ते आपल्या मुलांसह इंग्लंडला गेले. मात्र प्रशिक्षक होण्यापूर्वी ते खेळाडू होते. ऑपरेशनमुळे संघाबाहेर बसण्याऐवजी त्यांनी आपले बोट कापून टाकले. गेड यांना मधल्या बोटाची समस्या होती. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्यास सांगितले होते. मात्र गेड यांना खेळायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हाताचे बोट कापून टाकले. म्हणूनच बेन स्टोक्सने आपल्या वडिलांच्या संघर्षाला सलाम करत शतक साजरे केले.
उभय संघातील दुसर्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे वेस्ट इंडीजने सुटकेचा श्वास घेतला आहे. हा सामना बरोबरीत सुटण्याची चिन्हे आहेत.