कराची - पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणारा इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा एकच खळबळ उडाली. हेल्समुळेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने स्थगित केल्याच्या चर्चांना ऊत आला. आता यावर खुद्द हेल्सनेच आपल्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहेत. या अपडेट सोबत त्याने अफवा पसरवणाऱ्यांना खडसावलं आहे.
अॅलेक्स हेल्स मायदेशी परतला असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले, की 'मी पाकिस्तान सोडून इंग्लंडमध्ये परत येईपर्यंत मला कोरोनाची लागण झालेली नव्हती. मात्र रविवारी सकाळी उठल्यानंतर मला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. यानंतर मी सर्व खबरदारी घेत आहे. पण अद्याप माझी कोरोनाची चाचणी झालेली नाही. ज्यावेळी ही चाचणी होईल, त्यावेळी मी याबद्दल सर्व माहिती देईन.'
मला कोरोनाची लागण झाल्याने, पाकिस्तान सुपर लीग स्थगित करण्यात आली. ही निव्वळ अफवा असून अशा खोट्या बातम्या पसरवणे बंद करा, हे खुप भयानक आहे, असेही हेल्सने म्हटलं आहे.