लंडन -अॅशेसच्या तिसऱया कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव स्मिथ तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे.
लॉर्ड्सवर झालेल्या अॅशेसच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथला जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू लागला. मानेवर आदळलेल्या या चेंडूने स्मिथ जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. काही वेळानंतर स्मिथ पुन्हा मैदानात उतरला. त्याने आणखी ९ चेंडूत १२ धावांची भर घालत तो व्यक्तिगत ९२ धावांवर बाद झाला. दुखापतग्रस्त स्मिथच्या बदली मार्कस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आले होते.
अॅशेसच्या पहिल्या दोन सामन्यात धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. या मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथने दोनही डावात शतके ठोकली होती. शिवाय, दुसऱ्या सामन्यातही त्याने ९२ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे स्मिथने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.
दरम्यान, लॉर्ड्स मैदानावर रंगलेला अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णीत राहिला. यजमान इंग्लंडने पाचव्या दिवशी (रविवारी) बेन स्टोक्सच्या नाबाद ११५ धावांच्या मदतीने दुसरा डाव ५ गडी बाद २५८ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, अंतिम दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात ६ गडी बाद १५४ धावा केल्या. यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.