लंडन -अॅशेसच्या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३५ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. या मालिकेत सर्वात जास्त चर्चा झाली ती ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची. स्मिथने या मालिकेत फलंदाजीमध्ये अफलातून प्रदर्शन करत सर्वांची वाहवा मिळवली. सोबत त्याने अनेक विक्रमही पालथे घातले.
हेही वाचा -भारतीय महिला खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी विचारणा, दोघांविरोधात गुन्हा दाखल
पहिल्यांदा ५० पेक्षा कमी धावांची खेळी -
ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या पाचव्या कसोटीत स्मिथने २३ धावांची खेळी केली. या मालिकेत स्मिथने पहिल्यांदा ५० धावांपेक्षा कमी धावा केल्या. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या स्मिथने ११०.५७ च्या सरासरीने ७७४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. १९९४ नंतर, कसोटीतील या सर्वोच्च धावा आहेत. याआधी ब्रायन लाराने ७७८ धावा केल्या होत्या.
२१ व्या शतकात असा विक्रम करणारा स्मिथ पहिलाच -
१९७१ मध्ये सुनील गावस्कर विंडीजविरुद्ध ५ पैकी ४ सामने खेळले होते. त्यामध्ये त्यांनी ७७४ धावा केल्या होत्या. एका सामन्यात गावस्कर दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. २१ व्या शतकात एका मालिकेत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम स्मिथने रचला आहे. असे करताना त्याने आपलाच विक्रम मोडित काढला. २०१४-१५ मध्ये स्मिथने भारताविरुद्ध ७६९ धावा केल्या होत्या.
स्मिथने मोडला इंझमामचा विक्रम -
स्मिथने अॅशेस मालिकेत आपले इंग्लंडविरुद्ध १० वे अर्धशतक लगावले. एका संघाविरुद्ध सर्वात जास्त अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आता स्मिथच्या नावावर झाला आहे. हा विक्रम करताना त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महाबली इंझमाम उल हकला मागे टाकले आहे. इंझमामने इंग्लंडविरुद्ध लागोपाठ ९ वेळा अर्धशतकी खेळी केली होती.
एका मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा स्मिथ १२ वा फंलदाज -
एका मालिकेत सर्वात जास्त धावा करण्याच्या विक्रमात स्मिथने १२ वे स्थान पटकावले आहे. तर, अॅशेसमध्ये त्याने पाचवे स्थान मिळवले आहे. याअगोदर १९३० मध्ये डॉन ब्रॅडमन यांनी ९७४ धावा, वाली हेडमंड यांनी १९२९ मध्ये ९०५ धावा, मार्क टेलर यांनी १९८९ मध्ये ८३९ धावा आणि ब्रॅडमन यांनी १९३७ मध्ये ८१० धावा केल्या होत्या.