मेलबर्न -आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलल्यास आयपीएल खेळण्यास तयार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही स्पर्धा आणि आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल होण्याची चर्चाही आहे.
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेल्या स्मिथने ऑस्ट्रेलियामध्ये सरावाला सुरूवात केली. यावेळी तो म्हणाला, ''ऑस्ट्रेलियन सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी तो भारतात जाण्यास तयार आहे. देशासाठी वर्ल्डकप खेळणे यापेक्षा चांगले काहीही नाही. निश्चितच मी वर्ल्डकपला प्राधान्य देईन पण जर तो पुढे ढकलला गेला आणि आयपीएल झाली तर, मी या लीगमध्ये खेळण्यास तयार आहे.''
आयपीएलमध्ये आतापर्यंत 81 सामने खेळलेला स्मिथ म्हणाला, "मी याबद्दल विचार केलेला नाही. आम्ही सरकारच्या सल्ल्याचे पालन करू. जेव्हा योग्य वेळ येइल आणि जेव्हा आम्हाला विचारले जाईल, तेव्हा आम्ही नक्की पुनरागमन करू. तोपर्यंत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट राहण्याची गरज आहे.''
ऑस्ट्रेलियाच्या अव्वल क्रिकेटपटूंनी सोमवारी सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये सराव करण्यास सुरुवात केली आहे. या सरावात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल स्टार्क यांच्यासह इतर खेळाडूंनीही सहभाग नोंदवला. यावेळी संघाचा मुख्य फलंदाज स्टीव्ह स्मिथने आपली प्रतिक्रिया दिली. ''दोन महिने फलंदाजीपासून दूर राहून शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची काळजी घेतली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मी तंदुरुस्तीच्या सर्वोत्तम स्तरावर आहे'', असे स्मिथने सांगितले.