नवी दिल्ली -चेंडूशी छेडछाड प्रकरणातील बंदीनंतर क्रिकेटमध्ये परतलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव स्मिथने कोहलीला क्रमवारीत मागे टाकले आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत स्मिथने अव्वल स्थान पटकावले आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या अॅशेसच्या चौथ्या सामन्यासाठी दुखापतीमुळे बाहेर गेलेल्या स्मिथला संघात स्थान देण्यात आले आहे.
स्मिथ हा विराटच्या फक्त एक गुणाने पुढे आहे. स्मिथला अॅशेसच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली तर हा गुणांचा फरक वाढू शकतो. विंडीजविरुद्धच्या मालिकेत विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला १३६ धावा करता आल्या.
याविरुद्ध स्मिथने अॅशेसच्या सुरुवातीला धमाकेदार कामगिरी केली. त्याने या मालिकेत ३३८ धावा जमवल्या आहेत. २०१५ च्या डिसेंबरपर्यंत स्मिथने अव्वल स्थान राखले होते. मात्र, बंदीची शिक्षा मिळाल्यानंतर विराटने स्मिथला मागे टाकले होते. या क्रमवारीसोबतच कसोटीतील गोलंदाजांमध्ये हॅट्ट्रिकवीर बुमराहने तिसरे स्थान राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या तर आफ्रिकेचा कगिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर आहे.
विराटने धोनीला मागे टाकले -
विराट कोहली आता भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विंडीजविरुद्धचा विजय हा विराटचा कसोटीतील २८ वा विजय ठरला. भारताचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने कर्णधार म्हणून २७ कसोटी विजय मिळवले आहेत.