बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध शानदार शतक झळकावले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीचे ९ वे शतक आहे. या शतकासह त्याने भारतात मोठा विक्रम रचला.
हेही वाचा -२०२१ मध्ये धोनी आयपीएल खेळणार का?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल ३ वर्षानंतर, स्मिथने शतक ठोकले आहे. यापूर्वी, १९ जानेवारी २०१७ मध्ये स्मिथने पाकिस्तानविरूद्ध पर्थमध्ये शतक केले होते. भारताविरूद्ध स्मिथचे हे तिसरे शतक आहे. तर, भारतीय खेळपट्टीवर स्मिथचे हे पहिलेच शतक आहे. क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये सांगायचे झाले तर, भारताविरूद्ध स्मिथचे हे १० वे शतक आहे.
या शतकासह स्मिथने श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसुर्याच्या विक्रमाची बरोबरी साधली. या दोघांनी एकूण १० वेळा भारताविरूद्ध शतक ठोकले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारताविरूद्ध सर्वाधिक १४ शतके ठोकली आहेत. चिन्नास्वामी येथील सामन्यात स्मिथने १४ चौकार आणि एका षटकारासह १३१ धावांची वादळी खेळी केली आहे.