अबुधाबी - राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात राजस्थानला ५७ धावांनी पराभव पत्करावा लागला.
याबद्दल आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे, की ही संघाची पहिली चूक असल्याने आयपीएलच्या आचार संहितेनुसार षटकांची गती कमी राखल्याने स्मिथला १२ लाखांचा दंड लावण्यात आला आहे. स्मिथच्या आधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यांनाही षटकांची गती कमी राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.
आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईनी प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९३ धावा केल्या होत्या. राजस्थानला १९४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानला १८.१ षटकात सर्वबाद १३६ धावाच करता आल्या.
मुंबईने ८ गुणांसह नेट रनरेटच्या आधारावर गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर आरसीबीचा संघ आहे. त्यानंतर गुणतालिकेत चौथे स्थान हे केकेआरच्या संघाने पटकावले आहे. धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर राजस्थानचा संघ सातव्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघ आठव्या स्थानावर आहे.