सिडनी - ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतील दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत पाकिस्तानचा इंजमाम उल हक आणि वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपाल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. इंजमाम आणि चंद्रपाल यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत ११ वेळा एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात ५० हून अधिक धावा केल्या होत्या. स्मिथने या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. स्मिथने या सामन्यात पहिल्या डावामध्ये १३१ धावांची खेळी केली. तर दुसऱया डावात देखील त्याने ८१ धावांची खेळी साकारली.
कसोटी क्रिकेटमध्ये एका कसोटीतील दोन्ही डावात सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत १५ वेळा अशी कामगिरी केली आहे.