दुबई -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीचा फटका विराटला बसला आहे.
हेही वाचा -सिंधूचा गौरव!..आंध्रप्रदेशमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत विराटला अनुक्रमे २ व १९ अशा फक्त २१ धावा करता आल्या. भारताने ही कसोटी गमावली आहे. नव्या यादीत विराटच्या खात्यात ९०६ तर, स्मिथच्या खात्यात ९११ गुण जमा झाले आहेत. कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान गाठण्याची स्मिथची ही आठवी वेळ आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन या यादीत तिसर्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टलाही या क्रमवारीत फायदा झाला आहे. साऊथीने सहावे तर, बोल्टने १३ वे स्थान राखले आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराही गोलंदाजांच्या क्रमावारीत अव्वल दहामधून बाहेर फेकला गेला आहे.