मेलबर्न -बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत रोखल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे १०४ तर रविंद्र जडेजा ४० धावांवर खेळत आहे. संघ अडचणीत असताना, रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी करत शतक झळकावले. त्याच्या या खेळीचे कौतूक ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने केले.
काय म्हणाला स्टार्क
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्ट्रार्क म्हणाला की, 'रहाणेने शानदार खेळी केली. संघ दबावात असताना, त्याने हा दबाव झुगारुन लावत समोर येऊन खेळी साकारली. त्याला बाद करण्याची आम्हाला तीन, चार वेळा संधी मिळाली. पण भाग्यची साथ त्याला लाभली आणि त्याने शतक झळकावले.'
आमच्यासाठी आजचा दिवस निराशजनक राहिला. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर झेल सुटला. यावरुन आमची स्थिती लक्षात येते. आम्ही संधी निर्माण केली. पण त्याचे रुपांतर यशात करता आले नाही. रहाणेने दुसऱ्या दिवशी चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करत भागिदारी केली. उद्या आम्हाला लवकरात लवकर पाच गडी बाद करावे लागतील, असे देखील स्टार्क म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर सामन्यावर पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाकडे पहिल्या डावात ८२ धावांची लीड झाली आहे.
हेही वाचा -धोनी नाम ही काफी है! दशकातील सर्वोत्तम आयसीसी एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व माहीकडे
हेही वाचा -ICC च्या संघात भारतीयांचा बोलबाला; पाकिस्तानची पाटी रिकामी