कोलंबो - श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू अरविंद डीसिल्वा यांनी लंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंदा अल्थागामगे यांचा आरोप फेटाळला आहे. 2011च्या विश्वकरंडक स्पर्धेतील यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील अंतिम सामना 'फिक्स' होता, असा आरोप अल्थागामगे यांनी केला होता.
डीसिल्वा म्हणाले, "आम्ही लोकांना नेहमीच खोट्या गोष्टीपासून दूर ठेवू शकत नाही. मी आयसीसी, बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाला या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची विनंती करतो."
ते म्हणाले, "2011चा वर्ल्डकप भारताने जिंकला. सचिन तेंडुलकरसारख्या अनेक खेळाडूंनी आपल्या आयुष्यातील या क्षणांची कदर केली. मला वाटते की, या प्रकरणाची चौकशी केली गेली, तर ते सचिन आणि कोट्यावधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हिताचे ठरणार आहे. उद्भवणाऱ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे, हे भारत सरकारचे आणि त्यांच्या क्रिकेट मंडळाचे कर्तव्य आहे."
डीसिल्वा म्हणाले, "जेव्हा असे गंभीर आरोप होत असतात, तेव्हा त्याचा परिणाम बर्याच लोकांवर होतो. या प्रकरणात केवळ आम्हीच नाही तर, निवडकर्ता, विजेते खेळाडू आणि संघ व्यवस्थापन आणि जगावर प्रभाव पाडणारे भारतीय क्रिकेटपटूही आहेत. आम्हाला सर्वांना एकाच वेळी हे स्पष्ट करावे लागेल की, आपल्या आवडीचा खेळ निष्पक्ष आहे."
अल्थागामगे यांच्या दाव्यानंतर, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि माजी फलंदाज महेला जयवर्धने यांनी त्यांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेला अंतिम सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला. श्रीलंकेला अंतिम सामन्यात सलग दुसर्यांदा पराभव पत्करावा लागला.