कराची -बहुचर्चित मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर श्रीलंका आणि पाकिस्तान संघामध्ये कसोटी मालिका पार पडणार आहे. तत्पूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) एक जबरदस्त धक्का बसला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शामी सिल्वा यांनी पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणावरून धक्कादायक खुलासा केला आहे.
हेही वाचा -बीसीसीआयवर आजपासून 'दादा'गिरी सुरू.. गांगुलीच्या हाती अध्यक्षपदाची धुरा
'पाकिस्तानातील हॉटेलमध्ये बंद राहून आम्ही कंटाळलो होतो', असा खुलासा शामी सिल्वा यांनी कोलंबोमध्ये एका कार्यक्रमात केला. 'लंकेचे खेळाडू तीन दिवस हॉटेलमध्ये बंद असल्याने कंटाळले होते. मी सुद्धा कराचीमध्ये दोन दिवस हॉटेलमध्ये वैतागलो होतो', असे सिल्वा यांनी म्हटले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शामी सिल्वा यांनी सुरक्षेच्या कारणावरून हे विधान केले असल्याचे म्हटले आहे. 'निश्चितच आम्ही तिथे गेल्यामुळे पाकिस्तानला आनंद झाला. पण, डिसेंबरमध्ये ही कसोटी खेळली जाईल का हे पाहणे महत्वाचे ठरेल. पाच दिवस खेळाडूंना हॉटेलमध्ये बंद राहावे लागेल. त्यामुळे खेळाडूंना विचार करावा', असेही सिल्वा म्हणाले आहेत.
शामी सिल्वांच्या विधानावर पीसीबीने निराशा व्यक्त केली. पीसीबीने म्हटल्याप्रमाणे, पहिल्यांदा एखाद्या संघाला कडेकोट बंदोबस्त देण्यात आला होता. 'लंकेच्या खेळाडूंनी गोल्फ खेळण्याची परवानगी मागितली होती. सिंध आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंसाठी स्नेहभोजन ठेवले होते. मात्र, लंकेच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये राहणे पसंत केले', असेही पीसीबीने म्हटले आहे.