लंडन -आयसीसी विश्वकरंडकात आज २०व्या सामन्यात श्रीलंकेसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असणार आहे. श्रीलंकन संघाला या स्पर्धेत चारपैकी दोनच सामने प्रत्यक्ष मैदानात खेळता आले असून यातील एका सामन्यात त्यांचा पराभव आणि एका सामन्यात विजय झला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्याविरूद्धचे त्यांचे सामने पावसामुळे रद्द झाल्याने ४ गुणांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वकरंडकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवून ते ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात वॉर्नरसह, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, उस्मान ख्वाजा असे दमदार फलंदाज आहेत. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेहरेनडॉर्फ, नाथन कॉल्टर नाईल व केन रिचर्डसन, ऍडम झम्पा, नाथन लॉयन असा गोलंदाजांचा ताफा असल्याने स्पर्धेतील एक संतुलित संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जात आहे.
दिग्गज कांगारू फलंदाज स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे कांगारुंची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. वॉर्नरने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमध्ये दोन अर्धशतके आणि एक शतकाच्या जोरावर २५५ तर तर स्मिथने १७० धावा केल्या आहेत.