मुंबई- श्रीलंकेचा क्रिकेटपटू शेहान मदुशंका याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी श्रीलंकन पोलिसांनी अटक केली. या वृत्तानंतर, श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही कठोर पाऊल उचलत, शेहानचे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तत्काळ निलंबन केले आहे.
कोरोनामुळे श्रीलंकेतही लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. शेहान मदुशंका या लॉकडाऊनमध्ये, नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत होता. श्रीलंका पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे दोन ग्राम ड्रग्ज सापडले. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले. यावर स्थानिक न्यायालयाने मदुशंका याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या संदर्भातील वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे.
मदुशंका यांच्यावर झालेल्या पोलिसी कारवाईनंतर श्रीलंका बोर्डानेही कठोर पाऊल उचलली. त्यांनी मदुशंका याचे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निलंबन केले. या संदर्भात लंकन बोर्डानं मंगळवारी ट्विटरद्वारे शेहानवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती दिली. तसेच श्रीलंकन क्रिकेट बोर्ड या प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि तो पर्यंत शेहानला कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.