कोलंबो - श्रीलंकेचा दिग्गज माजी खेळाडू आणि फिरकीचा जादुगार अशी ओळख असलेला मुथय्या मुरलीधरन नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेचे नवनियुक्त राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
हेही वाचा -#HBDRAINA : टी-२० आणि वन-डे वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज..
या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या नवीन सरकारने नेमलेल्या तीन नवीन राज्यपालांमध्ये मुरलीधरनचा समावेश आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, राष्ट्रपती राजपक्षे यांनी मुरलीधरनला उत्तर प्रांताचे राज्यपालपद स्वीकारण्याचे निमंत्रण दिले.
मुरलीधरनची उत्तर प्रांतातील राज्यपाल म्हणून तर, अनुराधा यामपाथ यांना पूर्व प्रांताचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाईल. तिसा विठराना उत्तर मध्य प्रांताचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारतील. अनुराधा यामपाठ या राष्ट्रवादी उद्योजक संघटनेच्या अध्यक्षा आणि प्रतिष्ठित वस्त्र निर्यात कंपनीच्या संचालिका आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची करामत मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ८०० बळी घेतले आहेत. मुरलीधरनने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.