शारजाह- हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ५ बाद २०८ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉकने अर्धशतक (६७) झळकावले. डी कॉक बाद झाल्यानंतर हार्दिक आणि केरॉन पोलार्ड यांनी स्फोटक खेळी करत धावसंख्या वाढवली. अखेरच्या षटकात कृणाल पांड्याने धमकेदार फलंदाजी करत क्रिकेटप्रेमींना खुश केले.
हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर कृणाल पांड्या फलंदाजीसाठी आला. त्याला शेवटच्या षटकातील चार चेंडू खेळण्यास मिळाली. त्यावेळेला मुंबई दोनशेपार मजल मारते की नाही, अशी शंका होती. पण कृणालने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत मुंबईला २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली. हे षटक वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याने टाकले. कृणालचा स्टाइट रेट तब्बल ५०० चा होता.