नवी दिल्ली - सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आज (शुक्रवार) चेन्नई येथील खासगी रुग्णालयात दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ५ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांनी स्वतःच व्हिडिओ तयार करून यातून आपण ठीक असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. मात्र ते कोरोनावर मात करु शकले नाही. क्रीडा जगाताने एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि महान धावपटू पी. टी. उषा यांनी एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली आहे.
बालसुब्रमण्यम यांचा संक्षिप्त परिचय -
एसपीबी यांचा जन्म ४ जून १९४६ला आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कोनेटम्मापेटा येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रह्मण्यम असे होते. गायक एस. पी. शैलजा यांच्यासह त्यांना दोन भाऊ व पाच बहिणी आहेत. पार्श्वगायक बालसुब्रह्मण्यम यांनी १९६६मध्ये त्यांचे गुरू एस. पी. कोदंडपाणी यांचा तेलुगु चित्रपट श्री श्री श्री मर्यादा रामण्णाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी लवकरच कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषांमधील चित्रपटामध्येही गायन केले.
एस. पी. बालसुब्रमण्यम हे बर्याच जणांचे आकर्षण आहेत आणि त्यांनी बऱ्याच चित्रपटांची शीर्षक गीते गायिली आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम केला असून यासाठी त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव कोरले गेले आहे. त्यांनी दरवर्षी सरासरी तब्बल ९३० गाणी गायिली किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, दररोज सुमारे ३ गाणी गायली. एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आतापर्यंत तब्बल 40 हजारहून अधिक गाणी गायिली आहेत. हा विक्रम जगातील कोणत्याही गायकासाठी सहजासहजी मोडता येणार नाही असा अत्युत्कृष्ट आहे.