मुंबई- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज सकाळी (बुधवारी) उपचारादरम्यान, त्याची प्राणज्योत मालवली. इरफान यांच्या अचानक जाण्याने सर्वच स्तरातून दु: ख व्यक्त केले जात आहे. क्रिकेट विश्वातून भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, गौतम गंभीर, मोहम्मद कैफ, शिखर धवन, सुरेश रैना, मोहम्मद शमी, सिद्धार्थ कौल आदि खेळाडूंनी त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, आपल्या सहज सुंदर अभिनयाने व्यक्तीरेखा जिवंत करणारे अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर ते अलिकडेच भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणीखाली वावरत होते. काल (मंगळवार) त्यांची अचानक तब्येत बिघडली. देशभरात लॉकडाऊन सूरु असल्याने त्यांच्या दैनंदिन उपचारामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने अधिक दक्षता घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत्यूने गाठले.
गेल्याच आठवड्यात त्यांना मातृशोक झाला होता. गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. मात्र लॉकडाऊनमुळे इरफान आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. हे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या आईचं अंत्यदर्शन घेतलं.
इरफान खान गेली दोन वर्षे न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर या आजाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर लंडनमध्ये इलाज सुरू होता. यातून ते बरे झाले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट स्वीकारला होता. याचे काही शूटींगही पार पडले होते. हा चित्रपट पूर्ण होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतानाच त्यांनी आजारातून उठल्यानंतर कंबर कसली आणि लंडनमध्ये पुढील शूटींगला सुरूवात केली. त्यानंतरच ते मायदेशी परतले होते.
गेली दोन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या इरफान यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ठरल्याप्रमाणे 'अंग्रेजी मीडियम' थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान कोरोना व्हायरसाचा संक्रमणाचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे थिएटरमध्ये लागलेला अंग्रेजी मीडियम लोकांना पाहताच आला नाही. अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.