माउंट माउंगानुई - भारतीय संघाने न्यूझीलंड विरुध्दचा अखेरचा पाचवा टी-२० सामना ७ धावांनी जिंकला आणि न्यूझीलंड संघाला ५-० ने व्हाईट वॉश दिले. भारतीय संघाने दिलेले १६४ धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही. न्यूझीलंडचा संघाला २० षटकात ९ बाद १५६ धावा करता आल्या. दरम्यान, या सामन्यात विश्रांती देण्यात आलेला विराट कोहली आणि दुखापतग्रस्त केन विल्यम्सन यांनी संघाबाहेर राहूनही 'गेम स्पिरीट' दाखवले. या दोघांचा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व दिले. तर केन विल्यम्सन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पाचव्या टी-२० सामन्यात दोघेही वॉटरबॉयच्या भूमिकेत दिसले. या दोघांसोबत ऋषभ पंतही दिसून आला.
पाचव्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर म्हणून संधी मिळालेला युवा फलंदाज संजू सॅमसन केवळ २ धावा काढून माघारी परतला. तेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुल यांनी केलेल्या खेळींच्या जोरावर भारताला १६३ धावांपर्यंत मजल मारता आली.