मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे होणाऱ्या आगामी बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या प्रकरणांध्ये घट झाल्यानंतर व्हिक्टोरिया स्टेटचे प्रमुख डॅनियल अँड्र्यूज यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका वृत्तानुसार, अँड्र्यूज म्हणाले, ''बॉक्सिंग डे कसोटीला वेगळे महत्त्व आहे. मला विश्वास आहे, की बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला एमसीजी मैदानावर प्रेक्षक असतील. दर्शकांची आकडेवारी माहित नाही. परंतू प्रेक्षक असतील आणि या दिशेने काम चालू आहे." २६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग-डे कसोटी रंगणार आहे.
२०१८-१९मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला दौरा केला होता, तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली होती. यंदा ऑस्ट्रेलिया दौर्यावर, भारताला २७ नोव्हेंबर २०२० ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.