पुणे- देश-विदेशातील गणरायांचे भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी आवर्जून पुण्यात येत असतात. गणपती दर्शनासाठी आवर्जून पुण्यात येणाऱ्या भक्तांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या आणि पुण्यात कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी देशातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला कुटुंबीयांसह भेट दिली व श्री गणरायाचे दर्शन घेतले.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे घेतले दर्शन
पुण्यात कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला कुटुंबीयांसह भेट दिली व श्री गणरायाचे दर्शन घेतले.
विविध खेळांच्या निमित्ताने पुण्यात नेहमीच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची रेलचेल असते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट खेळाडूंनी जगभर ख्याती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी या क्रिकेटपटूंच्या इच्छेचा आदर करत त्यांना श्रींचे दर्शन घडवले.
दक्षिण आफ्रिका किकेट संघातील एनरिक नॉजे, जुबेर हमजा, डेन पीएड्ट आणि त्याची पत्नी, व्हर्नोन फिलँडर आणि त्याची पत्नी यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातील दालनास भेट देत तेथील शस्त्रास्त्रे, अवजारे आणि फोटोंचे अवलोकन करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली. त्या नंतर बोलताना खेळाडू म्हणाले की, आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात नेल्सन मंडेला यांनी निकराने लढा दिला होता. मंडेला यांनी आपल्या देशवासियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले आणि भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनसामान्यात स्वातंत्र्याची बीजे रोवली, या दोघांच्याही कार्यात समानता असल्याचे मत या खेळाडूंनी मांडले.