केपटाऊन - ज्यो रुट आणि डॉम सिबले यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर, इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाअखेर मजबूत आघाडी घेतली आहे. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाअखेर ४ बाद २१८ धावा केल्या आहेत. तर त्यांच्याकडे पहिल्या डावाची मिळून एकूण २६४ धावांची आघाडी झाली आहे. शेवटच्या दोन षटकात इंग्लंडने दोन गडी गमावले.
सिबलेने २२२ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावांची खेळी केली. तर रुट ६१ धावांवर बाद झाला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११६ धावांची भागिदारी केली. या दोघांशिवाय ज्यो डेनली आणि जॅक क्राऊले यांनी अनुक्रमे ३१ आणि २५ धावांचे योगदान दिले. आफ्रिकेकडून एन्रिच नॉर्येने दोन तर ड्वेन प्रिटोरियस आणि कासिगो रबाडाने प्रत्येकी एक गडी बाद केला.