महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आजच्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने सर केले होते ४३५ धावांचे आव्हान

१२ मार्च २००६ ला दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता

South Africa

By

Published : Mar 12, 2019, 5:19 PM IST

डरबन - आजच्या दिवशीच म्हणजे १२ मार्च २००६ ला दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ४३४ धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती.

धावफलकावर एवढी मोठी धावसंख्या पाहून कोणाताही संघ हतबल झाला असता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी करून दाखवत १ विकेट आणि १ चेंडू राखून ४३८ धावा करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने ५ सामन्यांची वनडे मालिकाही ३-२ ने आपल्या खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेने मिळवलेला हा विजय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला.

कर्णधार रिकी पाँटिंगच्या १०५ चेंडूत १६४ धावांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारीत ५० षटकांमध्ये ४ गड्यांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ४३४ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून पाँटिंग व्यतिरीक्त अॅडम गिलख्रिस्ट (५५), सायमन कॅटिच (७९) आणि मायकेल हसीने ८१ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चारशेपार नेण्यास मदत केली होती.

विजयासाठी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्शल गिब्जने २१ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १११ चेंडूत १७५ धावांची विध्वंसक खेळी केली आणि अशक्‍यप्राय असा विजय मिळवला. गिब्जसह ग्रेम स्मिथने ९०, तर मार्क बाउचरने ५० धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या त्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

या वनडे सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ८७२ धावा केल्या होत्या. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी एकूण ८७ चौकार आणि २६ षटकारांचा पाऊस पाडत धावांचा डोंगर उभा केला होता. एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या करण्याचा आणि सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रम या सामन्यात घडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details