डरबन- दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात किंग्समेड, डरबन येथे तिसरा एकदिवसीय सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार श्रीलंकेवर ७१ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० अशी विजयी आघाडी घेतली. यामध्ये आफ्रिकेच्या डि कॉकने १०८ चेंडूत १२१ धावा करताना सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
डि कॉकचे शतक फळाला; दक्षिण आफ्रिकेने विजयासह मालिका जिंकली - डि कॉक
दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार श्रीलंकेवर ७१ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० अशी विजयी आघाडी घेतली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. रिझा हेंन्ड्रिक्स अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. डि कॉकने एका बाजूने चांगली फलंदाजी करतान डु प्लेसीस ३६ धावा आणि रस्सी वॅन डर डुसेनने ५० धावा यांच्यासोबत भागीदारी करत आफ्रिकेला मजबूत स्थितीत पोहोचवले. डेव्हिड मिलर ४१ धावा आणि फेहलुकवायोने १५ चेंडूत ३८ धावांची खेळी करताना श्रीलंकेसमोर ३३२ धावांचे आव्हान उभे केले.
श्रीलंकेच्या फलंदाजीवेळी पावसाने खेळात व्यत्यय आणल्यामुळे सामन्याची षटके कमी करण्यात आली. श्रीलंकेला २४ षटकात १९३ धावांचे आव्हान देण्यात आले. श्रीलंकेच्या संघाला २४ षटकात १२१ धावाच करता आल्या. आफ्रिकेकडून ताहिरने २ गडी बाद केले. शम्सी, रबाडा आणि एनगिडीनेही प्रत्येकी १-१ गडी बाद केला. मालिकेतील पुढील सामना १३ मार्चला पोर्ट एलिझाबेथ होणार आहे.