सिडनी - सध्या सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका संघाने प्रवेश नोंदवला. या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला १७ धावांनी नमवले. भारतीय संघानंतर अंतिम चारमध्ये प्रवेश करणारा आफ्रिका हा दुसरा संघ ठरला आहे. तर, पाकिस्तानसाठी पुढचा प्रवास कठीण होणार आहे.
हेही वाचा -Unstoppable! जोकोविच दुबई ओपनचा पाचव्यांदा विजेता
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १३६ धावा केल्या. आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर १७ धावांत माघारी परतले. त्यानंतर मात्र, मॅरिझाने कॅप्पने वोल्व्हार्डसह आफ्रिकेचा डाव सावरला. कॅप्पने ३२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ३१ धावा केल्या. कॅप्प माघारी परतल्यानंतर वोल्व्हार्डने संघाची कमान आपल्या हाती घेतली. तिने ८ चौकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तान संघाला ५ बाद ११९ धावा करता आल्या. मुनीबा अली १२ धावांवर माघारी परतली. त्यानंतर उमैमा सोहेल आणि निदा दार यांनाही फलंदाजी करताना अपयश आले. कर्णधार जवेरीया खानने ३१ आणि आलिया रियाझने ३९ धावा केल्या खऱया, पण त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. आफ्रिकेची २० वर्षीय फलंदाज लॉरा वोल्व्हार्डला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.