सुरत - लालाभाई काँट्रेक्टर स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या महिलांच्या अंतिम टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा १०५ धावांनी पराभव केला. पाहुण्यांच्या १७६ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या ७० धावाच करू शकली. भारताने ही मालिका ३-१ ने जिंकली आहे.
हेही वाचा -एमसीएमध्ये ठाण्याला मिळाले प्रतिनिधीत्व! कमिटी सदस्य म्हणून विहंग सरनाईकांचा विक्रमी विजय
आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात खुप खराब झाली. युवा खेळाडू आणि सलामीवीर शेफाली वर्मा चार धावा करु शकली. भारताने १३ धावांवर आपले सहा फलंदाज गमावले. शेफाली व्यतिरिक्त स्मृति मंधाना पाच आणि हरमनप्रीत कौर एक धाव करुन बाद झाली. तर, जेमिमा रोड्रिग्वेज, तानिया भाटिया या फंलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर आलेल्या वेदा कृष्णमूर्ती आणि अरुंधती रेड्डी यांनी संघाचा डाव सावरला. वेदा कृष्णमूर्तीने २६ तर रेड्डीने २२ धावा केल्या. या दोन खेळाडूनंतर आलेले फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. आफ्रिकेकडून नेडिन क्लेर्कने तीन तर, शबनिम इस्माइल, एन बॉश आणि नोंदूमीसो सांगाजे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज माघारी धाडले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकलेल्या आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १७५ धावा केल्या होत्या. आफ्रिकेकडून लिजले लीने ८४ धावांची खेळी केली तर, कर्णधार सुन लुसने ६२ धावा जोडल्या. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी १४४ धावांची भागीदारी रचली. भारताकडून पूनम यादव, अरुंधती रेड्डी आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.