मुंबई- रणजी करंडकातील गुजरात विरुद्ध केरळ यांच्यातील सामना जसप्रीत बुमराह खेळणार असल्याने, चर्चेत आला होता. मात्र, अखेरच्या क्षणी बुमराह या सामन्यातून बाहेर पडला आहे.
सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात बुमराह गुजरात संघाकडून मैदानात उतरणार अशा चर्चा रंगल्या होत्या. खुद्द निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी याविषयी सांगितले होते. तसेच दुखापतीतून सावरलेला बुमराह या सामन्यात दिवसाला फक्त १२ षटके गोलंदाजी करणार असल्याचे, सांगण्यात आले होते. मात्र, आता बुमराहने रणजी सामना खेळू नये, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना वाटत आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, 'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अद्याप बराच अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत बुमराहला लाल चेंडूवर सराव करण्याची घाई नाही. तो टी-२० मध्ये पांढऱ्या चेंडूवर ४ षटके गोलंदाजी सुरू करू शकतो. न्यूझीलंडचा दौरा जवळ येईल, तेव्हा बुमराह रणजी सामना खेळेल.'