नवी दिल्ली -बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या सत्रातील व्हर्च्युअल व्ह्यूअरशिप आणि रेटिंगमुळे खूपच खूष आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम मार्चमध्ये खेळवण्यात येणार होता. मात्र, कोरोनामुळे हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली होती. नंतर बीसीसीआयने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
गांगुली म्हणाला, "आम्ही ही स्पर्धा यूएईत घेण्यासाठी स्टार (ड्रीम ११ आयपीएलचे अधिकृत प्रसारक) आणि त्यासंबंधित प्रत्येकाशी चर्चा केली, सर्व गोष्टींवर चर्चा केल्यानंतर स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला. आम्हाला क्रिकेटची सुरूवात करायची होती आणि मिळालेल्या प्रतिसादाने मला आश्चर्य़ वाटत नाही." आयपीएलच्या १३व्या सत्रातील पहिल्या आठवड्यात सुमारे २६ कोटी लोकांनी सामने पाहिले, जे मागील वर्षाच्या तुलनेत प्रति सामन्यापेक्षा १.१ कोटी अधिक आहे.
आयपीएल ही जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा असल्याचे सांगत गांगुली पुढे म्हणाला, "आतापर्यंत अनेक सुपर ओव्हर झाल्या. एका सामन्यात डबल सुपर ओव्हरचा अनुभवही सर्वांनी घेतला. शिखर धवनची फलंदाजी पाहिली, रोहित शर्माला पाहिले, सर्व तरुण युवा खेळाडूंची आक्रमक खेळी पाहिली आणि लोकेश राहुलचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचे कमबकही आपण पाहिले. तुम्हाला येथे सर्वकाही मिळेल. मी तुम्हाला सांगू शकतो की यावर्षी आयपीएल रेटिंग्जच्या बाबतीत असो किंवा खेळ पाहणार्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत सर्व विक्रम मोडेल."
आयपीएल २०२०ची प्रेक्षकसंख्या -
टीव्ही व्ह्यूअरशिप मॉनिटरिंग एजन्सी बार्क निल्सेन यांनी 'आयपीएल -२०२०चे टेलिव्हिजन व्ह्यूअरशिप आणि जाहिरातींचा वापर' या अहवालात म्हटले आहे, की सध्याच्या हंगामाच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक मिनिटाची दर्शकसंख्या मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढली आहे. या स्पर्धेचा लीग टप्पा या आठवड्यात संपणार आहे, तर प्लेऑफ सामने पुढील आठवड्यात खेळले जातील. अंतिम सामना १० नोव्हेंबरला दुबईमध्ये होईल.