कोलकाता - टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सद्या यष्टीरक्षणासह फलंदाजीत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळे त्याच्यावर माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पंतची पाठराखण करत त्याला अजून वेळ द्यायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.
महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून ऋषभ पंतकडे बघितले जात आहे. मात्र, पंत बांगलादेश विरुध्द सुरू असलेल्या टी-२० मालिकेत यष्टीरक्षणासह फलंदाजीतही अपयशी ठरला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात २६ चेंडूत २७ धावा करणाऱया पंतने यष्टीरक्षण व डीआरएसचा निर्णय घेताना केलेल्या चुकांचा फटका भारताला बसला. दुसऱया सामन्यात त्याने यष्टीच्या पुढे चेंडू पकडून चूक केली. मात्र त्याने धावबाद व यष्टीचीत करत आपल्यावरील दबाव कमी केला.