नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने रविवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची भेट घेतली. सुत्रांच्या सांगण्यानुसार, गांगुली आज दिल्लीला जाणार आहे. तिथे तो गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेईल. त्यामुळे गांगुली भाजपात जाण्याच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र, यासंबंधी काही बोलण्यास गांगुलीने नकार दिला आहे.
हेही वाचा -फोटो : ग्लोब सॉकर पुरस्कार 2020
गांगुलीने रविवारी राज्यपाल जगदीप धनकड यांची भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीबाबत राज्यपाल धनकड यांनी माहिती दिली. ''बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी आज (रविवारी) सायंकाळी साडेचार वाजता बैठक झाली. १८६४ मध्ये स्थापित झालेल्या इडन गार्डन्स मैदानाला भेट देण्याची गांगुलीची विनंती मी स्वीकारली आहे'', असे धनकड यांनी सांगितले. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर गांगुली भाजपावासी होतो का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यपाल जगदीप धनकड आणि सौरव गांगुली गांगुली २००० ते २००४ या काळात भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. कसोटी पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने १३१ धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा १०वा फलंदाज ठरला.
गांगुलीने १९९२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे तो संघाबाहेर राहिला. गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.