कोलकाता - भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गांगुलीच्या टीकाकारांनी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आयपीएल फ्रेंचायझीच्या कर्णधाराला मदत करत असल्याचा आरोप केला. मात्र, गांगुलीने हा आरोप फेटाळून लावला. गांगुली म्हणाला, ''मी भारतासाठी जवळपास ५०० सामने खेळलो आहे. त्यामुळे मी युवा खेळाडूशी बोलू शकतो किंवा त्याला मदत करू शकतो, मग तो श्रेयस अय्यर असो किंवा विराट कोहली. जर त्यांना मदत हवी असेल तर मी करू शकतो.''
''भारतासाठी ५०० सामने खेळलोय, श्रेयस काय विराटलाही मी सल्ला देऊ शकतो''
आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सौरव गांगुलीचे मार्गदर्शनासाठी आभार मानले. यानंतर, गांगुलीवर हितसंबंधाची जपणूक करण्याचा ठपका ठेवण्यात आला.
इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत सांगितले, की संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली (२०१८मध्ये संघाचा मेंटॉर) यांच्या योगदानामुळे एक यशस्वी खेळाडू आणि कर्णधार होण्यास मला मदत झाली. यानंतर, गांगुलीवर हितसंबंधाची जपणूक करण्याचा ठपका ठेवण्यात आला.
त्यानंतर श्रेयसने एक ट्विट केले. तो म्हणाला, ''एक युवा कर्णधार म्हणून मी गेल्या मोसमात क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून माझ्या प्रवासाचा भाग असल्याबद्दल रिकी आणि दादाचा आभारी आहे. कर्णधार म्हणून माझ्या वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.''