नवी दिल्ली - माजी कर्णधार सौरव गांगुली आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेंटर म्हणून कार्यरत आहे. दिल्ली संघाच्या सराव सत्रात त्याने सहभाग घेतला. त्यात त्याने फलंदाजीचाही सराव केला. त्याचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की गांगुलीने काळाला पाठीमागे टाकले आहे. ९० च्या दशतकातला हा खेळाडू ड्राइव्ह आणि कट्स पाहून खूश होतो.
सौरव दिल्लीच्या फील्डिंग सेशनमध्येही सहभागी झाला. ऑफ साईडचा देव मानला जाणाऱ्या गांगुलीने काही अप्रतिम कव्हर ड्राइव्ह मारले. या व्हिडिओत सहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफदेखील दिसत आहे.
या सीझनमध्ये दिल्लीने २ सामने खेळले असून त्यांना एका सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्लीने ३७ धावांनी हरविले तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीचा पुढचा सामना शनिवारी फिरोजशाह कोटला मैदानावर कोलकाता नाईट रायडर्ससोबत होणार आहे.