मुंबई -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड करण्यात आली आहे. राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली. गांगुलीची निवड अध्यक्षपदी तर, सचिवपदी गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा -#HBD गौती : गंभीरची विश्वविजेती झुंझार खेळी... श्रीसंतचा झेल अन् धोनीच्या षटकाराने ठरली अंधुक
बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेची जबाबदारी सांभाळणे हे गांगुलीसाठी आव्हान असेल असे शुक्ला यांनी म्हटले आहे. रविवारी बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत गांगुलीची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 'या नियुक्तीमुळे मी आनंदी आहे. बीसीसीआयची प्रतिमा मलिन झाली असल्याने माझ्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची ही योग्य संधी आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे. तुम्ही जरी बिनविरोध निवडले गेले असाल तरी, एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी मोठी गोष्ट आहे', असे गांगुलीने नियुक्ती झाल्यावर म्हटले.
आगामी आयपीएलच्या हंगामासाठी गांगुलीला चेअरमनपद देण्यात आले होते. मात्र त्याने ते नाकारले. त्यामुळे गांगुलीऐवजी बृजेश पटेल यांना चेअरमनपद सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही. त्यामुळे ४७ वर्षीय गांगुली फक्त एका वर्षासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहणार असून पुढच्या वर्षी तो 'कूलिंग ऑफ पीरियड' मध्ये जाईल. गांगुली मागील पाच वर्षांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कार्यरत आहे.