लंडन - इंग्लिश काऊंटी क्रिकेट क्लब सोमरसेटने न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कोरी अँडरसनबरोबरचा करार रद्द केला आहे. हा करार टी-20 ब्लास्ट स्पर्धेसाठी होता. परस्पर संमतीच्या आधारे हा करार रद्द करण्यात आल्याचे क्लबने म्हटले आहे.
कोरी अँडरसन भविष्यात क्लबकडून खेळण्यासाठी परत येईल, असा विश्वासही सोमरसेटने यावेळी व्यक्त केला. 29 वर्षीय अँडरसनने 14 गटातील सामन्यांसाठी सोमरसेटबरोबर करार केला होता. जर त्याचा संघ बाद फेरीपर्यंत पोहोचला तर त्याला तेथेही खेळावे लागणार आहे.
सॉमरसेट क्रिकेटचे संचालक अँडी हरी म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून सर्वांना त्रास होत आहे. कोरोनाच्या आजाराच्या दुष्परिणामांना तोंड देण्याची आव्हाने अभूतपूर्व राहिली आहेत. करार रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याबद्दल कोरी आणि त्यांच्या प्रतिनिधींचे मी आभार मानू इच्छितो."
अँडरसनने न्यूझीलंडकडून आतापर्यंत 13 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत. काही दिवसांपूर्वी, इंग्लंड क्रिकेट काऊंटी स्पर्धेतील ग्लॉस्टरशायर संघाने पुजाराशी केलेला करार रद्द केला होता. पुजाराला काऊंटी क्रिकेटमध्ये सहा चॅम्पियनशिप सामने खेळावे लागणार होते.