विजयवाडा -क्रिकेटमध्ये व्यत्यय आलेला कोणालाच आवडत नाही. पाऊस, कमी प्रकाश, चाहत्यांची मैदानात घुसखोरी या कारणांनी खेळात नेहमी व्यत्यय आल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र, आजपासून सुरू झालेल्या रणजी स्पर्धेतील एका सामन्यात चक्क सापामुळे व्यत्यय आला.
हेही वाचा -३५ वी हॅट्ट्रिक नोंदवत मेस्सीने मोडला रोनाल्डोचा विक्रम
आजपासून स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठित मानली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेतील विदर्भ विरुद्ध आंध्रप्रदेश सामन्यात चक्क सापामुळे व्यत्यय आला. त्यामुळे या सामन्याला सुरुवात होण्यास थोडा उशीर झाला. सापाचा हा व्हिडिओ बीसीसीआयच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
यंदा रणजी स्पर्धेचा ८६ वा हंगाम आहे. गतविजेत्या विदर्भ संघाचा पहिला सामना आंध्रप्रदेश विरुद्ध विजयवाडा येथे होत आहे. या सामन्यात विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या डावाच्या अगोदरच मैदानात साप आल्याने सामन्याला उशीर झाला. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडूंचा कस पाहणारी आणि वरिष्ठ संघात निवड होण्यासाठी महत्वाची मानली जाणारी यंदाची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु झाली. ३८ संघांमध्ये ही स्पर्धा ९ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या १३ मार्चपर्यंत रंगणार आहे.