मुंबई- भारतीय महिला क्रिकेट संघाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मानधाना लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये १० तास झोप, घरकाम, मूव्ही याशिवाय ऑनलाईन लूडो खेळण्याचा आनंद घेत आहे. बीसीसीआयने स्मृतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती तिचा दिवसभाराचे रुटीन सांगत आहे.
देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे काही राज्यांनी उद्या (१४ एप्रिलला) संपणारा लॉकडाऊन देखील वाढवला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९१५२ वर पोहोचला आहे. यामध्ये ७२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी ८५७ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, देशात ३०८ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशातील ७९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊनमुळे भारतीय संघाचे खेळाडू देखील सध्या घरात बसून आपापल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्मृती सांगलीतल्या घरीच, परिवारासोबत वेळ घालवत आहे. या काळात ती स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे विशेष लक्ष देत आहे. याशिवाय घरकामात आईला मदत, लुडो खेळणे आणि भावासोबत दंगामस्ती करणे हे तिचे रुटीन आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या १ मिनिट ३८ सेंकदाच्या व्हिडिओतून स्मृतीने तिचा डेली रुटीन सांगितला.