मुंबई- भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर भारतीय संघात परतलेला नाही. त्याच्या पुनरागमनाच्या शक्यता अनेकदा वर्तवण्यात आल्या, परंतु त्या चुकीच्या ठरल्या. आयपीएलनंतर तो भारतीय संघात कमबॅक करेल, अशी आशा होती. पण, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आयपीएल स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. यामुळे धोनी भारतीय संघात दिसणार की नाही, हे सांगणे कठीण आहे. अशात बीसीसीआयला ( बीसीसीआय) गुरुवारी अचानक धोनीची आठवण झाली. त्यांनी सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन धोनीचा एक हसरा फोटो शेअर केला आहे. त्याला बीसीसीआयने आनंदी राहा.. असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, सद्या कोरोना विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. पण, चिंता सोडून आनंदी राहा, असे बीसीसीआयला सुचवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वांना आनंदी राहण्याचा संदेश दिला आहे. यासाठी त्यांनी धोनीचा हसरा फोटो वापरला आहे.