मुंबई- श्रीलंका क्रिकेट बोर्डाने, भारतीय नियामक क्रिकेट मंडळाकडे जून-जुलै महिन्यात नियोजित असलेली एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवावी, अशी विनंती केली आहे. भारतीय संघ जून-जुलै महिन्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार होता. परंतु, कोरोनामुळे या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट आहे. अशात लंकनं बोर्डाने या दौऱ्याचा विचार बीसीसीआयने करावा, असे म्हटलं आहे.
श्रीलंकेच्या एका वृत्तपत्रांने या संदर्भात वृत्त दिलं आहे. त्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट मंडळ जुलैच्या अखेरच्या टप्प्यात भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळण्यास उत्सुक आहे. या विषयासंबंधी श्रीलंका बोर्डाने बीसीसीआयला मेलही पाठवला आहे.
भारत-श्रीलंका यांच्यातील ही मालिका विनाप्रेक्षक खेळवण्यात येईल, असे श्रीलंका बोर्डाच्या अधिकाऱ्यांने सांगितलं आहे. याशिवाय या दौऱ्यात खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, असेही त्या अधिकाऱ्यांनं सांगितलं आहे.