ऑकलंड - न्यूझीलंड दौर्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील ६ खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने (एनझेडसी) गुरुवारी हे वृत्त दिले. एनझेडसीकडून सांगण्यात आले, की पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी क्वारंटाइनच्या पहिल्याच दिवशी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ६ खेळाडूंना कोरोनाची लागण
पाकिस्तान क्रिकेट संघातील ६ खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने (एनझेडसी) गुरुवारी हे वृत्त दिले.
"या सहा पैकी दोन चाचण्यांचे निकाल जुने आहेत. तर चार नवीन आहेत. न्यूझीलंडमध्ये संघाच्या आगमनासंदर्भातील नियमांनुसार सहा सदस्य क्वारंटाइनमध्ये राहतील", असे मंडळाने सांगितले.
चाचण्या पूर्ण होईपर्यंत पाकिस्तानची सरावाची परवानगी थांबवण्यात आली आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी संघाचा फलंदाज फखर जमानलाही कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यामुळे त्याला दौऱ्यावरून वगळण्यात आले. न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पाकिस्तानसोबत तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. हा दौरा १० डिसेंबरपासून सुरू होईल. या दौऱ्यापूर्वी, न्यूझीलंड वेस्ट इंडिजबरोबर दोन कसोटी आणि तीन टी -20 सामने खेळणार आहे.