कराची - पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज जावेद मियाँदाद नेहमी सडेतोड तसेच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग करणारे खेळाडू, देशाला विकतात अशांना फासावर लटकवा, अशी मागणी केली आहे. मियाँदाद यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.
ते म्हणाले, 'खेळाडू फिक्सिंग करतात, भरपूर पैसे कमवतात. त्याच्यावर आरोप झाल्यावर ते माफी मागून मोकळे होतात. पण अशा खेळाडूंना माफी नाही तर त्यांना फासावर लटकवले पाहिजे. फिक्सिंग एकप्रकारे हत्याच असून हत्येची शिक्षा हत्याच आहे.'
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूंना माफी देऊन चूक करत आहे. त्यांनी यासारखे कृत्य करणाऱ्या खेळाडूला फासावर लटकावून उदाहरण सेट केले पाहिजे. यामुळे पुढे जाऊन असे कृत्य कोणी करणार नाही, असेही मियाँदाद म्हणाले.
दुबईमध्ये इस्लामीक पद्धतीने शिक्षा दिली जाते. एखाद्याने चोरी केली तर त्याचे हात कापले जातात. याच पद्धतीची अवलंब पीसीबीने केला पाहिजे. जो करेल तो भरेल. देशाला विकणाऱ्याला माफी द्यायला नको, असेही मियाँदाद म्हणाले.