मुंबई -आयपीएलच्या आगामी (२०२०) हंगामासाठी १९ डिसेंबरला लिलाव प्रक्रिया कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत. या अदलाबदलीमध्ये सर्वच संघ एकमेकांच्या संघातील चांगले खेळाडू आपल्या संघात घेण्यास इच्छुक आहेत. अशातच मुंबई इंडियन्सचा एक मराठमोळा क्रिकेटपटू कोलकाता नाईट रायडर्स संघात दाखल झाला आहे.
हेही वाचा -द्विशतकवीर मयांकने मोडला दिग्गज ब्रॅडमन यांचा 'हा' मोठा विक्रम
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी मुंबईने सिद्धेश लाडला सोडले आहे. सिद्धेश आता २०२० मध्ये कोलकाता संघाकडून खेळताना दिसेल. बीसीसीआयने याबद्दल अधिकृत माहिती दिली. सिद्धेश २०१५ पासून मुंबईच्या संघात होता. मागील हंगामात त्याने मुंबईसाठी पहिला सामना खेळला होता. या सामन्यात त्याने १३ चेंडूत एका षटकारासह १५ धावा केल्या होत्या.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या ट्रेंट बोल्टला संघात घेतले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनेही अंकित राजपूत या युवा खेळाडूला आपल्या चमूत दाखल करून घेतले आहे.