नवी दिल्ली - 'मिस्टर क्रिकेट' म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलचे कौतुक केले आहे. शुबमन हा भारतीय क्रिकेटचे भविष्य असल्याचे हसीने सांगितले. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत पृथ्वी शॉच्या जागी शुबमनला संघात सलामीवीराची संधी मिळाली. या संधीचे सोने करत शुबमनने भारताच्या कसोटी संघात यशस्वी पदार्पण केले. मालिकेच्या तीन कसोटीत त्याने ५१.८ च्या सरासरीने २५९ धावा कुटल्या. यात त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
एका संकेतस्थळाशी बोलताना हसी म्हणाला, ''ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. मला वाटते की शुबमन गिलचा खेळ संघातील सर्व खेळाडूंपेक्षा चांगला होता. भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. तो ज्या प्रकारे फलंदाजी करतो तो उत्कृष्ट आहे. याशिवाय पंतही कौतुकास पात्र आहे.