मुंबई- आयसीसी विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर भारत आणि बांगलादेश संघातील खेळाडूंमध्ये भरमैदानात राडा झाला. या प्रकरणात आयसीसीने बांगलादेशचे ३ तर भारताच्या दोन खेळाडूंवर कारवाई केली. दरम्यान, बांगलादेशच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेला शोरिफूल इस्लामने, आम्हाला बदला घ्यायचा होता. यामुळे आम्ही त्या पद्धतीने सेलिब्रेशन केले असल्याचे म्हटलं आहे.
शोरिफूलने एका इंग्रजी वृत्तापत्राशी बोलताना सांगितले की, 'विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी भारताने आम्हाला महत्वाच्या सामन्यात दोन वेळा पराभूत केले होते. त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने सेलिब्रेशन केले होते. आम्ही अंतिम सामन्यात उतरताना त्या सेलिब्रेशनचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. आम्ही अखेरच्या चेंडूवर लढलो आणि विजय मिळवला. त्यानंतर भारताने जसा यापूर्वी सेलिब्रेशन केले होते त्याच पद्धतीने आम्हीही सेलिब्रेशन केले. आम्हाला भारतीय संघाला याची जाणीव करून द्यायची होती की, जेव्हा विजय संघ पराभव झालेल्या संघाला चिढवतो, तेव्हा त्यांना काय वाटते.'
काय आहे प्रकरण -
विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामना डकवर्थ नियमाने जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला होता.