लाहोर -पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकला ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. पाकिस्तानने गेल्या १२ महिन्यांपासून घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळलेली नाही. आता त्यांना झिम्बाब्वेसमवेत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि नंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.
काही दिवसांपूर्वी, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला. मलिक टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला आशियाई आणि तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड यांनी हा पराक्रम केला आहे.
मालिकेच्या वेळापत्रकानुसार उभय संघ ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर, ३ नोव्हेंबरला एकदिवसीय सामने खेळणार आहेत. ही एकदिवसीय मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा एक भाग आहे. वर्ल्डकप सुपर लीगचे पहिले सात संघ २०२३मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होतील. त्यानंतर दोन्ही संघ ७, ८ आणि १० नोव्हेंबरला लाहोरमध्ये टी-२० सामने खेळणार आहेत. गेल्या पाच वर्षांत झिम्बाब्वेचा हा दुसरा पाकिस्तान दौरा असेल.