मुंबई - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर 7 चिमुकल्यांना वाचविण्यात यश आले. या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. आता तर थेट पाकिस्तानातून देखील हळहळ व्यक्त होत आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भंडारा अग्नितांडव प्रकरणावर एक ट्विट केले आहे. यात त्याने, शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे, असे म्हटलं आहे.
शोएब अख्तरच्या या ट्विटनंतर पाकिस्तानच्या काही नागरिकांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला आहे. शोएबच्या ट्विटवर अनेकांनी संवेदना जागवणारे तसेच भावनिक मेसेज केले आहेत. तर काहींनी शोएबला सुनावले आहे.
शोएबच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.