नवी दिल्ली - भारतीय गोलंदाज माझ्याकडून सल्ला घेतात, पण पाकिस्तानचे गोलंदाज सल्ला घ्यायला येत नाहीत, अशी खंत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केली. सध्या श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून, सुरू असलेल्या टी-२० मालिकेत लंकेने पाकिस्तानचा २-० ने पराभव करत विजयी आघाडी घेतली आहे. बऱ्याच कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येत आहेत. मात्र, यात पाकचा पराभव झाल्याने, माजी खेळाडूंसह चाहत्यांनी खेळाडूंना धारेवर धरले आहे.
शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलवर ही खंत बोलून दाखवली आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांना मदत करण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध आहे, ते माझ्याशी संपर्क करु शकतात. पण कोणताही गोलंदाज सल्ला घ्यायला येत नाही. उलट मोहम्मद शमीसारखे भारतीय गोलंदाज मला फोन करुन मदत मागतात. माझ्या देशासाठी मला वाईट वाटतं, असे शोएब म्हणाला.
दरम्यान, शोएब अख्तरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्याने शमीकडे स्विंगची कला असून तो भविष्यात रिव्हर्स स्विंगचा बादशाह होऊ शकतो, असे भाकितही वर्तवले आहे.