नवी दिल्ली -पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागच्या 'बाप-बाप होता है, बेटा-बेटा होता है' घटनेला फेटाळून लावले आहे. मुलतान कसोटीदरम्यान असा कोणताही किस्सा घडला नसल्याचे अख्तरने स्पष्ट केले. या कसोटी सामन्यात सेहवागने पाकिस्तानविरुद्ध 309 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती. एका अॅपवर झालेल्या संभाषणात अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली.
मार्च-एप्रिल 2004 मधील या कसोटीत सेहवागने असा दावा केला होता, की या खेळीच्या वेळी शोएब अख्तर त्याच्यावर नाराज झाल्यानंतर वारंवार आखूड टप्प्याचा चेंडू टाकत होता. अख्तरनेही सेहवागला हुक शॉट्स खेळायला सांगितले होते. पण सेहवागने अख्तरचे लक्ष दिग्गज सचिन तेंडुलकरकडे वेधले होते. अख्तरने सचिनला चेंडू टाकताच त्याने चौकार ठोकला आणि त्यानंतर सेहवाग म्हणाला, 'बाप-बाप होता है, बेटा-बेटा होता है'.
आज 16 वर्षांनंतर शोएब अख्तरने या घटनेला चुकीचे म्हटले आहे. अख्तर म्हणाला, ''सेहवागच्या या गोष्टी खोट्या आहेत. मी सेहवागला हुक मारायला कधीच सांगितले नाही. 2011 मध्ये मी सेहवाग आणि गंभीर यांच्याशी या विषयावर संभाषण केले होते. गंभीरलाही याची जाणीव आहे. सेहवाग आणि गंभीर ही चांगली माणसे आहेत. पण जेव्हा ही माणसे टीव्हीवर बोलतात तेव्हा ते तोंडाला वाट्टेल तसे बोलतात. मीसुद्धा कधीकधी त्यांच्याबद्दल चुकीचे बोलतो पण अशा गोष्टी कधीही बोलू शकत नाही कारण मुले देखील हा कार्यक्रम पाहतात.''
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 मार्च 2004 ला झालेल्या कसोटी सामन्यात सेहवागने 309 धावा केल्या होत्या तर सचिन तेंडुलकर 194 धावांवर नाबाद राहिला होता. या सामन्यात भारताने पहिला डाव 5 विकेट्सवर 675 धावांवर घोषित केला होता. पाकिस्तानचा पहिला डाव 407 तर दुसरा डाव 216 धावांवर संपुष्टात आला होता. भारताने हा सामना एक डाव आणि 52 धावांनी जिंकला होता.