मुंबई -संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने इम्रान खान यांना जोरदार फटकारले होते. याच मुद्दयावरून भारताचा सलामीवीर शिखर धवनने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा -'त्या' 15 मिनिटांत माणसाची वृत्ती समजली, गौतम गंभीरने इम्रान खान यांना फटकारले
'भारतव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस भयानक अवस्था होत चालली आहे. काहीही अपराध नसलेल्या माणसांचा बळी दिला जात आहे. याप्रकरणी, यूएन आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था डोळे झाकून का बसल्या आहेत, हेच कळत नाही', असे ट्विट आफ्रिदीने केले होते. या ट्विटचा शिखर धवनने खरपूस समाचार घेत त्याला उत्तर दिले आहे.
'प्रथम स्वतःच्या देशातील अवस्था सुधारा. तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलंच आहे आणि भविष्यात काय करायचंय हेसुद्धा आम्हाला चांगलं माहित आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका', असे धवनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आफ्रिदीच्या ट्विटवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही उत्तर दिले आहे. 'एक भारतीय म्हणून अशा निराधार टीका पाहून मला वाईट वाटले. काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील', असे इशांतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.