दुबई - दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन सद्या सुसाट फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२० मध्ये सलग दोन सामन्यात दोन शतक झळकावलीत. या कामगिरीसह त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
शिखर धवन आयपीएल इतिहासात सलग दोन सामन्यात दोन शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात ६१ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद १०६ धावा केल्या. यासामन्याआधी त्याने चेन्नईविरुद्ध ५८ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १०१ धावांची खेळी साकारली होती. या दोन शतकासह धवनने आयपीएलमध्ये १६९ सामन्यात पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वात जास्त शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने २०१६ च्या आयपीएल हंगामात खेळताना ४ शतकं झळकावली होती. या यादीत ख्रिस गेल, हाशिम आमला, शेन वॉटसन संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी प्रत्येकी २-२ शतकं झळकावली होती. त्यांच्या या विक्रमाशी धवनने बरोबरी साधली आहे.